* नगरदेवळा पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका
* सुप्रीम कोर्टाचा 25 नोव्हेंबरचा निकाल ठरविणार निवडणुकीचे भवितव्य
* नगरदेवळ्यात तरुण नेतृत्व पुढे येताच राजकीय तापमान चढले
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे भविष्य 25 नोव्हेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्पष्ट होणार असले, तरी नगरदेवळा परिसरात मात्र निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राज्यातील 20 जिल्हा परिषदांचे आरक्षण 50 टक्क्यांवरून जास्त गेले, तर उर्वरित 15 जिल्हा परिषदांचे आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत असल्याने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निवडणूक प्रक्रियेचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. निकाल काहीही असो, निवडणुका जानेवारी 2026 पूर्वी होणार आहेत, यात सर्वांचे एकमत आहे.
* नगरदेवळ्यात तरुणाईचा जोर :- या निवडणुकीत नगरदेवळा गट व गणात तरुणाईने मोठ्या प्रमाणात पुढे येत राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत. गावातील नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक तरुण पूर्ण ताकदीने तयारीला लागले आहेत. माजी उपसरपंच विलास राजाराम भामरे (पिंटू भामरे), माजी उपसरपंच सागर पाटील, विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे, रोशन जाधव सर, दिपक ऊर्फ सोनू परदेशी, अभिषेक बोरसे जिब्राईल शेख हे नाव स्पर्धेत पुढे आलेले आहेत.
या तरुणांनी मागील 5 ते 10 वर्षांत समाजकारण व राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांची उपस्थितीच निवडणुकीत नवा उत्साह निर्माण करत आहे.
* पक्षांकडून मोठे प्रयत्न - कोणाला मिळणार संधी ? :- भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी या सर्वच पक्षांमध्ये तरुण उमेदवारांचा जोर वाढला आहे. प्रत्येक पक्ष आपला भक्कम तरुण चेहरा पुढे करण्यासाठी पावले टाकत असून, तिकीट वाटपात तरुणाईला मोठा वाटा मिळण्याची शक्यता अधिक आहे.
* गावाचा रखडलेला विकास - तरुण नेतृत्वच बनेल ‘गेम चेंजर’ ? :- नगरदेवळा गावाचा मागील 20-30 वर्षांत विकास रखडला, ही ग्रामस्थांची मोठी नाराजी आहे. पायाभूत सुविधा, रोजगार, पाणीपुरवठा, रस्ते आणि ग्रामविकासाच्या अनेक कामांना गती मिळालेली नाही. मात्र, यंदा तरुणाई मोठ्या प्रमाणात पुढे आल्याने चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजकारणात कार्यरत असलेली ही पिढी दूरदृष्टी, विकासाभिमुख विचार, जनसंपर्क आणि तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमातून गावाला नवी दिशा देण्यास सक्षम असल्याचे ग्रामस्थ मानत आहेत.
* तरुण विरुद्ध तरुण : उत्साहात वाढ, राजकीय समीकरणे रंजक :- या निवडणुकीत जर तरुणाईचीच लढत झाली, तर सामना अत्यंत रंजक आणि विकासाभिमुख होणार हे निश्चित. तरुण रक्ताने नेतृत्व केल्यास गावाला “विकासाच्या रथावर बसवू” असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. नगरदेवळा निवडणुकीत तरुणाईच्या रुपाने गावाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्यानंतरचे राजकीय घडामोडी, हेच आगामी निवडणुकीचे खरे वळण ठरणार आहेत.

Post a Comment
0 Comments