Type Here to Get Search Results !

माध्यम भूषण : रसिकांचे आभूषण!

माजी पत्रकार, माजी दूरदर्शन निर्माते आणि निवृत्त माहिती संचालक असलेल्या देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या ' माध्यमभूषण' या पुस्तकात देवेंद्रजींनी छत्तीस 'माध्यमभूषणां'चा संपूर्ण जीवनपट शब्दबद्ध केला आहे. अशा प्रकारचे हे बहुधा मराठीतील पहिलेच पुस्तक असावे, असे वाटते. 

या पुस्तकातील पहिले माध्यमभूषण म्हणजे थोर साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक! ४१ कथासंग्रह, १० ललितगद्य पुस्तके, नाटके,  कादंबरी अशा साहित्य क्षेत्रात आश्वासक वाटचाल करणाऱ्या कर्णिक यांच्या कथेवर चित्रपटही प्रदर्शित झाले.

   

ताणतणावाच्या परिस्थितीत शांत राहून कामावरील निष्ठा ढळू न देणारे दूरदर्शनचे माजी संचालक याकूब सईद यांनी निवृत्तीनंतर चाळीस हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका पार पाडल्या.‌ नटरंग, जॉली एल.एल.बी. आदी हिंदी -मराठी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. 

     

कठीण परिस्थितीत शिष्यवृत्ती घेऊन हिंदीचे प्राध्यापक राहिलेल्या सुरेश पुरी यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम केल्यामुळे ते मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक झाले. त्यांनी भावी पत्रकारांना केवळ चार भिंतींच्या आतच शिकवले, असे नाही तर प्रत्यक्ष जीवनात उभे राहण्यासाठी मदत केली. दूरदर्शनवरील संहितालेखक ही सरकारी नोकरी सोडून लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून काम करण्याचा धाडसी निर्णय घेऊन प्रदीप दीक्षित यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन निर्मिती अशी चौफेर कामगिरी केली आहे. 

     

दूरदर्शनवील बातम्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली व्यक्ती म्हणजे वासंती वर्तक! घरगुती अनेक संकटांचा लवलेश चेहऱ्यावर येऊ न देता निष्ठेने जबाबदारी पार पाडणाऱ्या वासंतीताईंचा जीवनपट वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी येते. 

      

प्रकाश बाळ जोशी! मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये चाळीस वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासून,प्रदर्शने भरवून देशविदेशात सन्मान मिळवला.   


डॉं. किरण चित्रे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रातून निवृत्त झाल्यानंतर  विविध सांस्कृतिक आणि संगीतक्षेत्रात कार्य सुरू ठेवले आहे. 


ग्रामीण भागातील एक युवक दूरदर्शनवर  येऊन भरपूर कष्ट घेऊन स्वतःचे स्थान निर्माण करतो. 'आमची माती आमची माणसं' या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतो.स्वकष्टाने उपमहासंचालक  पदावर पोहोचतो ती व्यक्ती म्हणजे शिवाजी फुलसुंदर! 

   

जेष्ठ पत्रकार कांबळे यांच्याबद्दल लेखक म्हणतात, "चांगल्या पत्रकाराचे व्यावसायिक आयुष्य हे जितके मान सन्मानाचे असते, तितकेच  व्यक्तिगत जीवन सुखदुःखाचे क्षण हिरावून घेणारे असते."

   

थोर  कवी मंगेश पाडगावकर यांनी शाबासकी दिलेला कवी नंतर आकाशवाणीचा कल्पक, लोकप्रिय निर्माता, प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक म्हणून ख्यातकीर्त होतो  तो कोकणचा सुपुत्र म्हणजे डॉ. महेश केळुसकर! केळुसकर यांचा जीवनप्रवास वाचनीय असाच आहे.

     

अजित नाईक यांनी  दूरदर्शन छायाचित्रकार असताना एकाच कॅमेऱ्याने विविध कोनातून केलेले छायाचित्रण याबद्दल कौतुकाने लिहिले आहे.


विदर्भात एका स्त्री ने वास्तविक पाहता वृत्तपत्र सातत्याने पंचवीस वर्षे वृत्तपत्र चालविण्याचे अत्यंत अवघड असे श कार्य आहे शोभा जयपूरकर यांनी यशस्वीरित्या करून दाखवले आहे. 


विनय वैराळे यांनी 'महाभारत'  मालिकेचे  सहायक संकलक  म्हणुन मोठा नाव लौकिक मिळविला आहे. 


ध्वनिमुद्रक, संकलन, लेखन, साहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक, पी.आर.ओ., मॉडेल/आर्टिस्ट समन्वयक, इव्हेंट मॅनेजर, प्रसिद्धी प्रमुख, 'असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे सिद्धार्थ कुलकर्णी!  चित्रपट क्षेत्रातील सहा पिढ्यांसोबत काम करण्याची संधी कुलकर्णी त्यांना मिळाली. 

      

किसन हासे यांनी कुणाचाही आर्थिक हातभार नसताना आनंद प्रिंटर्स हा छापखाना सुरू करून पुढे 'संगम संस्कृती' हे साप्ताहिक आणि दैनिक युवावार्ता सुरू केले. त्यांचा प्रवास वाचताना वाटतो तितका सोपा नाही.

      

अमेरिकेत स्थायिक झालेले माधवराव गोगावले  भारतीय परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी  तिथे विविध उपक्रम  करीत असतात.

 

प्रा. डॉ. सुचिता पाटील यांनी  शेकडो कथा, कविता लेख लिहिले आहेत. त्यांनी २२२ माहितीपट, जाहिरातींना आवाज दिला आहे. यूट्यूब वाहिनीवर  ८०० बातमीपत्रे वाचली आहेत. 

    

घराघरांमध्ये पोहोचलेल्या  'बिग बॉस' शोमध्ये अत्यंत जरबयुक्त आवाजात आदेश देणारे  रत्नाकर तारदाळकर आहेत, हे आपल्याला या पुस्तकामुळे कळते. 


अभिनय  कलेतून, लेखनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यप्रवण असलेल्या माध्यमभूषण म्हणजे मेघना साने होत. 

     

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून माहिती अधिकारी म्हणून निवृत्त  झालेले रणजित चंदेल पंचाहत्तर वर्षांचे झाले असूनही  पत्रकारितेत सक्रिय आहेत. 


रंगभूषाकार शिवानी गोंडाळ यांनी नौशाद अली, आशा भोसले, अशोक सराफ, अनुपम खेर, जॉनी लिव्हर, पद्मिनी कोल्हापूरे, मनोज वाजपेयी अशा अनेक आशिब  कलाकारांची रंगभूषा केली आहे. त्याशिवाय त्यांनी हिंदी व मराठी लेख लिहिले आहेत .   

      

दूरदर्शनवर निवेदिका स्मिता गवाणकर या साप्ताहिकी, नाट्यावलोकन, हॅलो सखी, सप्रेम नमस्कार, मधुरा इत्यादी कार्यक्रमांमुळे रसिक प्रिय झाल्या आहेत. 

      

संहिता लेखिका  असलेल्या मर्मबंधा गव्हाणे यांच्या वरील लेखात लेखक महत्त्वाचा संदेश देतात, तो म्हणजे 'सर्व पालकांनी आपल्या मुलामुलींची आवड ओळखून  त्यांना शिकू दिले, करिअर करू दिले, तर अक्षरशः हजारो आत्महत्या टाळता येतील. तरुण पिढी मानसिकदृष्ट्या आजारी होण्यापासून, व्यसनाधीन होण्यापासून नक्कीच वाचून  सक्षम, आनंदी जीवन जगू  शकेल. 

     

सिंगापूर स्थित लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या नीला बर्वे म्हणतात, 'जर दुसऱ्या देशात कायमचे रहायला जायचे असेल तर तरुण वयात जावे. अन्यथा तिथे  स्थायिक होणे  अवघड जाते. 


ग्रंथालीच्या पन्नास वर्षांच्या प्रवासात साथ देणारी व्यक्ती म्हणजे सुदेश हिंगलासपूरकर! त्यांच्या  रोमहर्षक प्रवासाला लेखकाने कृतज्ञतापूर्वक रेखाटले आहे.

    

परिचारिका राहिलेल्या  मीना घोडविंदे लेखिका, कवयित्री म्हणून कशा घडत गेल्या, हे त्यांच्या जीवन कथेतून आपल्याला कळते. 


अमेरिकेत गेली चाळीस वर्षे कॅन्सरवर संशोधन करीत असलेल्या डॉ सुलोचना गवांदे या विविध माध्यमांतून कॅन्सर बद्दल किती तळमळीने जनजागरण करीत आहेत हे पाहून त्यांच्या विषयी मन आदराने भरून येते. 


मूळ अकोला येथील प्रणिता देशपांडे ही युवती युरोपातील नेदरलॅंड देशात जी पत्रकारिता आणि समाजकार्य करते ते पाहून आपण आश्चर्य चकीत होतो. 

  

'माध्यमभूषण'  पुस्तकात लेखक देवेंद्र भुजबळ यांनी अत्यंत तळमळीने रेखाटलेली सर्व  व्यक्तिचित्रणे वाचनीय, मार्गदर्शक, उद्बोधक नि अनुकरणीय आहे. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. 

           

- ‌माध्यमभूषण : व्यक्तीचित्रण संग्रह 

लेखक : देवेंद्र भुजबळ 

प्रकाशक: न्यूज स्टोरी टुडे 

नवी मुंबई. (९८६९४८४८००) 

आस्वाद : नागेश शेवाळकर पुणे

Post a Comment

0 Comments