* सीसीटीव्ही बंद असूनही तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची मोठी कारवाई
कर्जत / नरेश जाधव :- नेरळ पोलिस ठाणे हद्दीत बोरले गाव रोडलगत असलेल्या ग्लोब फँटासिया बांधकाम साईटवरील लोखंडी रॉड आणि सिमेंट गोण्यांच्या चोरीचा उलगडा करीत पोलिसांनी चार आरोपींना अटक करून महत्त्वपूर्ण मालमत्ता हस्तगत केली आहे. या चोरी संदर्भात गु. र. नं. 207/2025 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
घटनेचा तपास नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला. पथकातील पोह (2384) वाघमारे, पोशी (1836) केकाण, पोशी (467) बेंद्रे, पोशी (1415) वांगणेकर यांनी तपासाला गती देत सर्वप्रथम घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र ते बंद स्थितीत असल्याने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पुढील चक्रावून टाकणारा तपास सुरू झाला.
या तपासातून पोलिसांनी राकेश लक्ष्मण पारधी (वय 30), तबारक हुसैन अब्दुल्ला खान (वय 34), रवींद्र दत्ता कांबळे (वय 28), अतिश रामचंद्र चहाड (वय 33) या चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ₹30,000 किंमतीचे लोखंडी रॉड, ₹1,03,600 किंमतीच्या 370 सिमेंटच्या गोण्या, चोरीसाठी वापरलेले महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन आदी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.
गुन्ह्याच्या तपासात पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे तसेच डीवायएसपी राहुल गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. नेरळ पोलिसांनी दाखवलेली ही जलद व प्रभावी कामगिरी स्थानिक बांधकाम कंपन्या, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.

Post a Comment
0 Comments