* रविंद्र पवार यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार 2025’ - पारमी पवारची निवेदनकलेतील घोडदौड
गुहागर - तळवली / प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तळवली गावातील रविंद्र रोहिणी अनंत पवार यांना दिशा महाराष्ट्र चौथा वर्धापन दिन सोहळ्यात राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील डॉं. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, सानपाडा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. समाजकार्य, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान आणि अखंड सेवाभाव या त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
* समाजसेवेची भक्कम परंपरा :- रविंद्र पवार यांनी 2000 ते 2002 दरम्यान गुहागर - चिपळूण परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये, स्मरणशक्ती वाढ, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर तब्बल 80 विनामूल्य व्याख्यानांद्वारे युवक - विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवाभावी कार्याची जोरदार प्रशंसा होत असून, समाजासाठी केलेले योगदान आजही स्मरणात आहे.
* मनोरंजन क्षेत्रातही भक्कम उपस्थिती :- सध्या रविंद्र पवार मराठी मनोरंजन विश्वात निर्मिती प्रबंधक म्हणून सक्रिय असून झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी आपला बहुमोल सहभाग नोंदविला आहे. यात शिवा, वहिनीसाहेब, परिजात, देवयानी, जतोस्तुते, चाहूल, राधा प्रेम रंगी झाली, कुंकू टिकली, टॅटू, लागिर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, संभाजी, शोध अस्तित्वाचा, स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, घरोघरी मातीच्या चुली, ठरलं तर मग यांसह अनेक मालिकांचा समावेश आहे.
* कन्या पारमी पवार - अल्पवयातच तेजस्वी ओळख :- रविंद्र पवार यांची सुपुत्री पारमी दीपाली रविंद्र पवार (इयत्ता 8 वी) ही वडिलांच्या प्रेरणेने निवेदन क्षेत्रात भक्कमपणे वाटचाल करत आहे. मुंबईतील ‘भीमा तुम्हा वंदना’ कार्यक्रमात पारमीने निवेदिका म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या संयत, प्रभावी आणि स्पष्ट सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व तिच्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. वयाच्या चौथ्या वर्षापासून शालेय कार्यक्रमात निवेदनाची सुरुवात 'हसत खेळत प्रबोधन करू या’ आणि 'आपणच होम मिनिस्टर होऊ या’ या महिला जागरूकता कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन पारमीची या क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय असून तिच्या आवाजात आत्मविश्वास, शब्दांत नेमकेपणा आणि सादरीकरणात प्रगल्भता दिसते.
* पारमीसाठी आणखी एक मोठी संधी :- येत्या 20 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे सृष्टी फाऊंडेशन आयोजित हिंदी - मराठी गीतांच्या विशेष कार्यक्रमात पारमी पवार निवेदिका म्हणून काम पाहणार आहे. तिच्या कलेला मिळत असलेला हा आणखी एक मोठा मान आहे.
* रत्नागिरीचा गौरव वाढवणारी पिता - कन्या जोडी :- तळवली गावातील ही पिता - कन्या जोडी आपल्या कर्तृत्वाने, मेहनतीने आणि सातत्याने कार्यरत राहून समाजकार्य, मनोरंजन क्षेत्र, निवेदन कला या सर्वच क्षेत्रांत गावाचा, तालुक्याचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा मान अभिमानाने वाढवत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, ही जोडी भविष्यात आणखी नवी शिखरे गाठेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments