* कर्जत नगरपरिषद निवडणूक 2025 : भयमुक्त आणि शांततामय निवडणुकीसाठी पोलिसांचे शक्तीप्रदर्शन
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांतता, सुरक्षितता आणि पूर्ण पारदर्शकतेत पार पडावी यासाठी कर्जत पोलिस प्रशासनाने दंगा काबू योजना (रंगीत तालीम) तसेच शहरात भव्य रूट मार्च काढून दमदार तयारीचे प्रदर्शन केले.
सायंकाळी 4.30 ते 6.00 वाजेपर्यंत कर्जत पोलिस मैदानात दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. निवडणूक काळातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा या तालीमेतून सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.
तालीमनंतर निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी कर्जत शहरात भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला. हा रूट मार्च कर्जत पोलिस स्टेशन, डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कर्जत नगर परिषद, पाटील अळी, डेक्कन जिमखाना, जकात नाका, कर्जत मुख्य बाजारपेठ, श्री कपालेश्वर मंदिर परिसर, महावीर पेठ, आमराई, सुरभी नाका अशा प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला.
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत सुरक्षिततेची भावना दृढ केली. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे चित्र दिसले.
दंगा काबू योजना व रूट मार्चमध्ये कर्जत पोलिस ठाण्याचे 6 अधिकारी, 15 पोलिस अंमलदार, आरसीपी (RCP) प्लाटून कर्जतचे 1 अधिकारी, 18 पोलिस अंमलदार अशी एकूण भक्कम मानवी शक्ती तैनात होती. कर्जत पोलिसांच्या या तयारीमुळे नगर परिषद निवडणूक पूर्ण शांततेत, भीतीविरहित आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments