* गरिबांच्या सेवेसाठी कटिबद्ध जिल्हा परिषद सदस्याची निवड करा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कोराडी (नागपूर) / मिलिंद गाडेकर :- नांदा कोराडी येथील श्रीकृष्ण लॉनमध्ये कोराडी भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बावनकुळे म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य हा केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणारा असावा. पुढील 5 वर्षे जनतेची सेवा करणारा, पारदर्शक व जनसंपर्क असलेला प्रतिनिधी आपण निवडला पाहिजे.
* भाजपमध्ये संवाद, काँग्रेसमध्ये विसंवाद :- कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, भाजपात संवाद आहे, निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे ; तर काँग्रेसमध्ये विसंवाद, गोंधळ आणि पक्षतोड सुरू आहे. त्यांच्या नेत्यांचा स्वतःच्या कार्यकर्त्यांशी दुरावा वाढत आहे. ते पुढे म्हणाले की भाजप सोडून दररोज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इतर पक्षांतून भाजपात प्रवेश करीत असून राज्य व केंद्र शासनाच्या योजनांवरील जनतेचा विश्वास वाढतच आहे.
* खुन्नस ठेवू नका, पक्षाशी बेइमानी खपवून घेतली जाणार नाही :- बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना शिस्त आणि एकजूट यांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देतील त्याच्या मागे सर्वांनी उभे राहा. कुणाबद्दल खुन्नस ठेवून किंवा मतभेद ठेवून काम केल्यास पक्षाचे नुकसान होते. पक्षाशी बेइमानी खपवून घेतली जाणार नाही. तसेच त्यांनी कोराडी जिल्हा परिषद निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
* भाजप शासनाची कामगिरी मांडत बावनकुळे यांचा निवडणूक संदेश :- बावनकुळे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आणि मताधिक्याने झालेल्या विजयांचा उल्लेख करीत शासनाच्या लोककल्याणकारी निर्णयांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, 45 लाख शेतकऱ्यांची 27 हजार कोटींची कृषीपंप वीजबिल माफी, 60 लाख कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड, 125 शासकीय योजना (केंद्र 55, राज्य 48, पालकमंत्री म्हणून 22) सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारी, बेघर नागरिकांना 7/12 दस्तऐवज मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. चुकीचा माणूस निवडून दिला तर योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. योग्य व्यक्तीला संधी दिली तरच 125 योजना खरोखर जनतेपर्यंत पोहोचतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या जनसंवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन अक्षय काळे यांनी केले. मंचावर महिला आघाडी, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रीती मानमोडे, अनुराधा अमीन, सविता जिचकार, अर्चना दिवाणे, माया भोस्कर तर ग्रामीण मधील सरपंच नरेंद्र धनुले, लीलाधर भोयर, निलेश डफरे, हबीब छवारे, मोरे मॅडम, अरविंद खोबे, मोरेश्वर कापसे, कुणाल भोस्कर, बोधिसत्व झोडापे, नत्थु मांडेकर, पिंटू अंजनकर, विजय अंजनकर, दर्श गहुकर, गोलू वानखेडे, रवी वानखेडे, मदन राजुरकर, आशिष राऊत ,नितेश धुर्वे आणि मोठ्या प्रमाणात महिला, आणि नागरिक, उपस्थित होते.
कोराडी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप दमदार कामगिरी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments