* नारंडा येथील धक्कादायक घटना ; मुख्य आरोपीसह दोघांना कोरपना पोलिसांची झटपट अटक
चंद्रपूर / प्रतिनिधी :- कोरपना तालुक्यातील नारंडा परिसरात रविवारी (16 नोव्हेंबर) रात्री घडलेल्या एका थरारक घटनेत पतीची निघृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या कथित प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून तिच्या प्रियकराने मित्रासह कट रचून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृताचे नाव नितेश रामदास वाटेकर (रा. नारंडा) असे आहे.
नितेश वनसडी येथे हेअर सलून चालवत होता. दुकान बंद करून तो रात्री घरी निघाला ; मात्र उशीर होत असूनही घरी न पोहोचल्याने ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरा खडक्या नाल्याजवळ मोटारसायकलजवळच तो रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्याचा भाऊ सतीश वाटेकर घटनास्थळी पोहोचल्यावर नितेशच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमा दिसून आल्या. तातडीने त्याला कोरपना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉंक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वर्ष 2022 पासून नितेश गडचांदूर येथे भाड्याच्या घरात राहत होता. याच काळात त्याची पत्नी साधनाचे बादल सोनी या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले, अशी माहिती पुढे आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात नितेश आणि बादल यांच्यात या प्रकरणावरून तीव्र वाद झाला होता. त्यावेळी बादलने “तुला ठार मारीन” अशी धमकी दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पत्नी साधनाने पोलिसात तक्रार देण्यासाठी प्रयत्न केला होता ; मात्र बादलने माफी मागितल्याने आणि घर मोडू नये म्हणून तिच्या भावाने मध्यस्थी केली व तक्रार मागे घेण्यात आली.
रविवारी रात्री बादल सोनीने आपल्या मित्रास तुषार येनगंटीवार सोबत वनसडी परिसरात दारू प्यायली. त्याच वेळी नितेश घरी जाण्यासाठी निघाला. अंधाराचा फायदा घेत दोघांनी त्याचा पाठलाग केला आणि रागाच्या भरात बादलने नितेशच्या डोक्यात जड वस्तूने वार केला.
घटनेनंतर कोरपना पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून प्रमुख आरोपी बादल सोनी आणि साथीदार तुषार येनगंटीवार (रा. गडचांदूर) यांना अटक केली. दोघांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 103(1) - खुनाबाबत, कलम 3(5) - गंभीर गुन्ह्यांत सहभाग अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवानंद केकन व कोरपना पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.

Post a Comment
0 Comments