Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा परिषद येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ

* अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ठाणे / प्रतिनिधी :- भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियान (NMBA) च्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, ठाणे मुख्यालयात 18 नोव्हेंबर, 2025 रोजी अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून “नशामुक्ती शपथ” घेतली गेली.


जिल्हा परिषदेतील शपथ विधी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, समाज कल्याण विभाग प्रमुख तसेच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्वला सपकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग संजय बागुल, कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) युवराज कदम तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत, व्यसनमुक्त व निरोगी समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.


"मी शपथ घेतो / घेते की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू.” ही सामुहिक शपथ घेण्यात आली. 


जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.


Post a Comment

0 Comments