Type Here to Get Search Results !

रमजान महिन्यात रोजेदारांसाठी मोफत लिंबू वाटपाचा आदर्श उपक्रम

* नगरदेवळ्यात शेतकरी नामदेव नाना महाजन यांचा सामाजिक सलोख्याचा संदेश

नगरदेवळा / प्रतिनिधी :- रमजानच्या पवित्र महिन्यात मानवतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा एक स्तुत्य उपक्रम नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे राबविण्यात येत आहे. येथील शेतकरी नामदेव नाना महाजन यांनी रोजा ठेवणाऱ्या रोजेदारांसाठी मोफत लिंबू वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम सुरू करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतांना दिवसभर उपाशी राहणाऱ्या रोजेदारांसाठी इफ्तारच्या वेळी लिंबूपाणी अत्यंत उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते नामदेव नाना महाजन यांनी आपल्या शेतातील ताजे लिंबू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. रोजेदारांच्या आरोग्याची काळजी आणि माणुसकीची भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रमजान महिन्यात रोजा ठेवतांना उपवासादरम्यान शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा इफ्तारच्या वेळी मिळते. त्या वेळी लिंबूपाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असल्याने हा उपक्रम रोजेदारांसाठी दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे नगरदेवळा परिसरातील रोजेदारांमध्ये समाधान व्यक्त होत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


या उपक्रमाबाबत बोलतांना सामाजिक कार्यकर्ते नामदेव नाना महाजन म्हणाले की, धर्म वेगळे असू शकतात, पण माणुसकी एकच आहे. रमजान महिन्यात रोजेदारांना थोडा दिलासा मिळावा आणि सामाजिक बंधुभाव वाढावा, या भावनेतूनच हा उपक्रम सुरू केला आहे.


नगरदेवळा परिसरात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत असून, त्यामुळे समाजात परस्पर सन्मान, सहकार्य आणि धार्मिक सलोखा अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अनेकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


नामदेव नाना महाजन यांच्या या उपक्रमामुळे नगरदेवळा परिसरात सकारात्मक, एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून हा उपक्रम इतर शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments