* विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोगांचे सादरीकरण ; मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले
जिंतूर / प्रतिनिधी :- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 रोजी श्री संचारेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक कार्यवाह रविकुमार पेशकार अध्यक्षस्थानी होते, तर जिंतूरचे केंद्र प्रमुख मारोती घुगे, जि.प. शिक्षक प्रकाश डूबे, माध्यमिक शिक्षक मुकुंद डाके, शालेय समिती अध्यक्ष वसंतराव पुराणिक आणि मुख्याध्यापक दमण देगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थीनी अक्षरा कुरकुटे आणि पद्मजा बुधे यांनी विज्ञानावर आधारित गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक किरण नाईक यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करुत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. यानिमित्त संस्कार केंद्रातील इयत्ता 5 वी ते 7 वीतील एकूण 32 विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. मार्गदर्शन करतांना केंद्र प्रमुख मारोती घुगे म्हणाले की, प्रत्येक लहान मूल कुतूहलाने जगाकडे पाहते. निरीक्षण आणि कृतीयुक्त शिक्षणातूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो. तसेच प्रकाश डूबे, मुकुंद डाके आणि कपिल घुगे यांनी विद्यार्थ्यांना महान वैज्ञानिकांची माहिती देत विज्ञानाची उपयुक्तता समजावून सांगितली.
अध्यक्षीय समारोप करतांना मुख्याध्यापक दमण देगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले व विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी अक्षरा कुरकुटे व पद्मजा बुधे यांनी केले, तर आभार वर्षा गणगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विज्ञानप्रेमाची आणि नवचैतन्याची लाट उसळलेली दिसून आली.

Post a Comment
0 Comments