* 'अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण ; विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत
नगरदेवळा / प्रतिनिधी :- भारताचे महान शास्त्रज्ञ डॉं. सी. व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी ‘रमण परिणाम’ (Raman Effect) चा शोध लावला. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या वर्षी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक आणि जादूचे प्रयोग सादर करण्यात आले. प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असते, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख के. एस. शाह यांनी विविध प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जनजागृती निर्माण केली.
यावेळी सचिन देवरे यांनी डॉं. सी. व्ही. रमण यांच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. त्यांनी विज्ञान क्षेत्रातील रमण यांचे योगदान, त्यांच्या संशोधनाची वैशिष्ट्ये आणि विज्ञानातील जिज्ञासेचे महत्त्व याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, पर्यवेक्षक डी. पी. राजपूत, स्काऊट गाईड विभाग प्रमुख जी. यू. पवार तसेच सचिन देवरे, डी. व्ही. शिंदे, राहुल परदेशी, महेश कुमावत, अक्षय निकुंभ, निखिल शिरुडे, योगेश शिंपी, प्रयोगशाळा सहाय्यक आर. एस. पाटील आणि कल्पेश शिरुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन देवरे यांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता वाढीस लागली असून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न विद्यालयात करण्यात आल्याचे दिसून आले.

Post a Comment
0 Comments