Type Here to Get Search Results !

96 कोटींच्या मलनिस्सारण योजनेत 473 दिवसांचा विलंब

* ठेकेदारावर कारवाई नाही ? ‘आप’चा गंभीर आरोप

* खोपोली नगर परिषदेवर मेहरबानीचा ठपका

* उपोषणाचा दुसरा दिवस, नागरिकांमध्ये संताप

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेच्या 96.13 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण योजनेत तब्बल 473 दिवसांचा विलंब झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून संबंधित ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याने आम आदमी पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहे. भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
वेळेवर काम न करता ठेकेदार मोकळा ? :- नगर परिषदेकडून कार्यादेश (22 फेब्रुवारी 2023) देऊन सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे काम ठेकेदाराने ठरलेल्या मुदतीत पूर्ण केले नसल्याचा आरोप आहे. उलट कामात मोठा विलंब झाल्यानंतरही ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


* ठेकेदार नगर परिषदेचा जावई आहे का ? -  डॉं. रियाज पठाण :- आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक व सचिव डॉं. रियाज पठाण यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करीत म्हटले की, ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ठेकेदार नगर परिषदेचा जावई आहे का ? त्याला नियम माफ आहेत का ? अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत ? त्यांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधीचे नुकसान होत असल्याचा आरोपही केला.


* नोटीसा दिल्या, पण दंड नाही ? :- या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले की, टेंडरनंतर विविध परवानग्या मिळण्यात अडथळे आल्यामुळे कामात विलंब झाला. तसेच कामादरम्यान सुरक्षेबाबत दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराला 20 ते 23 नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. मात्र, इतक्या नोटीसा देऊनही दंडात्मक कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


* पत्रकारांना माहिती देण्यासही टाळाटाळ ? :- या प्रकरणात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही समोर आला आहे. त्यामुळे पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


* नागरिकांचा संताप, उत्तरांची मागणी :- सार्वजनिक निधीतून राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजनेत एवढा विलंब होऊनही ठेकेदारावर कारवाई न होणे, ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांना ठेकेदारावर इतकी मेहरबानी का ? असा सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.


* आंदोलन तीव्र होण्याची शक्यता :- आम आदमी पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे या प्रकरणाला अधिकच तीव्रता आली आहे. प्रशासनाने तातडीने यावर स्पष्ट भूमिका घेऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments