* पिंपळगाव हरे - जरंडी रस्त्यासाठी तीव्र उपोषण
* किती जणांचा बळी गेल्यावर रस्ता बनणार ?
* शेतकरी आनंता पाटील यांची तब्येत बिघडली
* तब्येत जास्तच खराब झाल्याने दवाखान्यात हलवले
* श्वेता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उपोषण
* जिल्हा व तहसिल प्रशासनाचे सर्रासपणे दुर्लक्ष
पाचोरा / फिरोज पिंजारी :- पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी दरम्यानच्या सुमारे 5 किलोमीटरच्या अत्यावश्यक रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता तीव्र झाले असून चौथ्या दिवशी उपोषणकर्ते आनंता धोंडू पाटील यांची प्रकृती गंभीर बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.पिंपळगाव हरेश्वर येथून जरंडी गावाकडे जाणारा सुमारे 5 किलोमीटरचा अत्यावश्यक रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून प्रत्यक्षात तो रस्ता अस्तित्वातच नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी 21 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या मार्गांवरून शेतात जाणे अत्यंत कठीण झाले असून, साधे पायी चालणेही धोकादायक ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलगाड्या विकण्याचा निर्णय घेतला आहे, कारण या रस्त्यावरून वाहतूक करणे अशक्य बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे बनले आहे.
* श्वेता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन :- सामाजिक कार्यकर्त्या श्वेताताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली 6 शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून, त्यांच्यासोबत दररोज 20 महिला-पुरुष शेतकरी साखळी उपोषणात सहभागी होत आहेत. 21 मार्च 2026 पासून सुरू झालेले हे आंदोलन आज चौथ्या दिवशी पोहोचले आहे.
* किती बळी घेतल्यावर रस्ता होणार ? - ग्रामस्थांचा संतप्त सवाल :- उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतानाही जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. “रस्ता दुरुस्त करण्यासाठी अजून किती बळी द्यावे लागतील?” असा तीव्र प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
* 12 वर्षांपासून निवेदने, तरीही कारवाई नाही :- या रस्त्याबाबत गेल्या 12 वर्षांपासून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार व प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
* रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, शेतीपर्यंत पोहोचणे कठीण :- पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, प्रत्यक्षात रस्ता अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गांवरून पायी चालणेही कठीण झाले असून शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे मोठे आव्हान ठरत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट बनते. काही शेतकऱ्यांनी तर रस्त्याअभावी बैलगाड्या विकल्याचेही सांगितले.
* प्रशासनातील विसंगती उघड :- या रस्त्याबाबत गंभीर प्रशासकीय विसंगती समोर आली आहे. महसूल विभागात हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 17 म्हणून नोंदविला आहे, तर जिल्हा परिषदेकडे तो ग्रामीण रस्ता म्हणून वेगळ्या क्रमांकाने दाखविला आहे. या विसंगतीमुळे शेतकऱ्यांना जमीन व्यवहारांमध्ये अतिरिक्त कर भरावा लागत असून सुविधा नसतानाही आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
* ठोस मागण्या :- शेतकऱ्यांनी शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात पिंपळगाव हरेश्वर - जरंडी रस्ता तातडीने दुरुस्त करावा, तज्ज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्का (काँक्रिट) रस्ता तयार करावा, महसूल विभागातील राज्य महामार्गांची चुकीची नोंद रद्द करावी, तातडीने निधी मंजूर करावा या मागण्यांचा समावेश आहे.
* प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्षाचा आरोप :- जिल्हा परिषद सीईओ, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, बिडीओ तसेच पंचायत समिती प्रशासन यांच्याकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवडणुका जवळ असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गंभीर नसल्याचे चित्र आहे.

Post a Comment
0 Comments