* बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वातावरण तापले ; पीडित महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर
पुणे / प्रतिनिधी :- महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या कथित भोंदूगिरी बाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, हे प्रकरण हाताळणाऱ्या सुषमा अंधारे तसेच इतर पीडित महिलांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने युवराज दाखले यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने आणि जबाबदारीने मांडली असून त्यामुळे राज्यभर या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षा देणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे मत आहे.
* प्रकरणाची गंभीरता वाढली :- युवराज दाखले यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुषमा अंधारे यांनी धाडसाने हा विषय पुढे आणला असून, त्यांना व इतर पीडित महिलांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. शिवशाही व्यापारी संघाच्या मागणीनंतर आणि प्रकरणाच्या गांभीर्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राजीनामा द्यावा लागल्याची माहितीही त्यांनी दिली.
* मुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे मागणी :- या संदर्भात शिवशाही व्यापारी संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे अधिकृत मागणी केली आहे. संबंधित प्रकरणात कार्यरत असलेल्या व्यक्तींना तात्काळ सुरक्षा पुरवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
* पीडित महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा :- या प्रकरणात केवळ एका व्यक्तीपुरता मुद्दा मर्यादित नसून अनेक महिलांचा प्रश्न असल्याने त्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments